2 तरूणींचा जीव वाचवणाऱ्या वहागावच्या RTO कन्या श्रद्धाला ‘जीवनदूत गौरव’ प्रदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | अपघातात जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या दोन तरूणींना महिला आरटीओ अधिकाऱ्यांनी आपल्या शासकीय वाहनातून उपचारासाठी दाखल करून त्यांचा जीव वाचवला होता. या कर्तव्यनिष्ठेबद्दल सातारा आरटीओ कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रध्दा विजय माने (वहागाव, ता. कराड) यांना मकर संक्रांती दिवशी सह्याद्री अतिथी गृहात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते जीवनदूत गौरव प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

याबाबतची माहिती अशी की, २० जून २०२३ रोजी आषाढी वारीच्या ड्युटीवर असताना फलटण-आदर्की रस्त्यावर एका दुचाकीचा मागील टायर फुटून अपघात झाला होता. अपघातात दुचाकीवरील साक्षी संतोष घाडगे आणि गौरी महेंद्र पवार या तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत बराच वेळ मदतीविना रस्त्यावर पडून होत्या. त्याच रस्त्याने निघालेल्या मोटार वाहन निरीक्षक प्रसन्ना पवार आणि श्रद्धा माने यांनी आपल्या शासकीय वाहनातून त्यांना तातडीने वाठार स्टेशन आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यनंतर सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी रूग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली.

हे कर्तव्य पार पाडताना मोटार वाहन निरीक्षक प्रसन्ना पवार, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रद्धा माने यांचा सहभाग होता. त्याबद्दल रस्ता सुरक्षा अभियान 2024 अर्तगत श्रध्दा विजय माने यांना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृहात सोमवारी जीवनदूत गौरव प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. याबद्दल श्रद्धा माने यांचे विविध क्षेत्रातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.