सातारा प्रतिनिधी । फलटण विधानसभा मतदार संघात मात्र उमेदवारापेक्षा जास्त येथील दोन दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेची हि निवडणूक मानली जात आहे. फलटण विधानसभा मतदारसंघ (Phaltan Assembly Constituency) हा राखीव मतदारसंघ आहे. याठिकाणी प्रतिनिधीत्व करणाऱ्या उमेदवारापेक्षा नेत्यांमधील लढाईच प्रतिष्ठेची ठरते. रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्या उमेदवारांमध्ये होणारी लढत ही चर्चेची असणार आहे. काळ जाहीर केलेल्या संभाव्य यादीत आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) यांचे नाव असल्याने त्यांची या ठिकाणी उमेदवारी निश्चित असल्याने त्यांच्यात आणि भाजपचे सचिन कांबळे पाटील यांच्यात लढत होणार आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघावर गेली पस्तीस वर्षे एकहाती रामराजे यांची सत्ता आहे. फलटण नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा या सर्व ठिकाणी रामराजे आणि बंधू संजीवराजे व रघुनाथराजे यांचीच सत्ता पाहायला मिळाली आहे. ज्या ज्या वेळी विरोधक म्हणून नवे नेतृत्व उभे राहिले त्या त्या वेळी रामराजे यांनी त्यांची राजकीय ताकत दाखवली आहे. परंतु लोकसभेसारखी महत्त्वाची निवडणूक जिंकून माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी नवीन सक्षम विरोधक म्हणून राजेगटाला आव्हान दिले. फलटण अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात दीपक चव्हाण तीन वेळा आमदार झाले. यावेळी त्यांचे तिकीट कायम राहिले आणि रामराजे यांनी राखून ठेवलेले डाव बाहेर काढले, तर दीपक चव्हाण चौथ्यांदा आमदार होऊन इतिहास घडवतील.
रणजितसिंह यांनी शेतकरी बागायतदार कुटुंबातील सचिन कांबळे पाटील यांची उमेदवारी मोठ्या जल्लोषात जाहीर केली आहे. गेली दोन वर्षे त्यांचे फलटण कोरेगावमध्ये दौरे सुरू आहेत. भाजपचे विधानसभा प्रमुख म्हणून त्यांनी तालुका पिंजून काढला आहे. ते जनतेला किती रुचतात हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
दि. १४ ऑक्टोबरला फलटण येथील भव्य सभेत संजीवराजे व आमदार दीपक चव्हाण कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. परंतु शरद पवार यांनी दीपक चव्हाण यांची उमेदवारी या सभेत जाहीर केली नाही. मात्र, कालच्या संभाव्य यादीत दीपक चव्हाण यांचे फलटण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार असे नाव होते. त्यामुळे शरद पवार यांनी अजितदादांच्या पक्षातून आपल्या पक्षात आलेल्या दीपक चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे हे नक्की.
२०१९ मध्ये झाली होती अटीतटीची लढत
फलटण विधानसभा मतदार संघतात मागील निवडणुकीत 2019 मध्ये तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून दीपक चव्हाण हे विजयी झाले. त्यांना निवडणुकीत 1 लाख 17 हजार 617 मत मिळाली होती. तर भाजपच्या दिगंबर आगवणे यांना 86 हजार 636 आणि वंचित बहुजन आघाडीच्या अरविंद आढाव यांना 5 हजार 460 मते पडली होती.
रामराजे यांचं फलटणवर वर्चस्व
फलटण विधानसभा मतदारसंघावर रामराजे नाईक निंबाळकर याचंं वर्चस्व राहिलं आहे. 2009 पूर्वी हा मतदारसंघ राखीव होण्यापूर्वी ते या मतदारसंघाचे आमदार होते. 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर फलटण हा अनूसुचित जातीसाठी राखीव मतदारसंघ झाला. 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण विजयी झाले. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यास दीपक चव्हाण चारवेळा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे पहिले आमदार ठरतील. ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. गेल्या तीन निवडणुकांमध्ये दीपक चव्हाणांसमोर वेगवेगळ्या उमेदवारांनी लढत दिली होती. या मतदारसंघात सलग तीनवेळा दीपक चव्हाण विजयी झाले.
फलटणमध्ये खरी लढत आता ‘मविआ’ विरुद्ध महायुतीत
फलटण विधानसभा मतदार संघात नुकताच राजकीय भूकंप झाला आहे. या ठिकाणी अजित पवार यांनी जाहीर केलेल्या ज्यांना उमेदवारी दीपक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हातात घेतली आहे. तसेच येथील मतदार संघातील जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनीही पक्षांतर केले आहे. या मतदार संघात या ठिकाणी दीपक चव्हाण विरुद्ध भाजकडून सचिन कांबळे पाटील अशी लढत होईल.
दीपक चव्हाण यांच्यासमोर कुणाचं आव्हान?
मुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी फलटण विधानसभा मतदारसंघातून दीपक चव्हाण यांना फोनवरुन उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, जाहीर केलेला उमेदवारच पक्ष सोडून गेल्याने या ठिकाणी उमेदवारच उरलेला नाही. त्यामुळे अजितदादा ऐनवेळी कुणाला उमेदवारी देणार कि हा मतदार संघ भाजपला सोडणार हे येणाऱ्या काळातच पहायला मिळेल. विशेष म्हणजे भाजपनं देखील या मतदारसंघात तयारी सुरु केली असून जागावाटपात ही जागा कुणाकडे जाणार हे पाहावं लागेल. भाजपकडून सचिन कांबळे पाटील या मतदारसंघातून तयारी करत आहेत.
२५५ फलटण विधानसभा
एकूण मतदार – ३३८४६४
पुरुष मतदार – १७२४५९
स्त्री मतदार – १६५९९१
इतर मतदार – १४ २०१९
विधानसभा निकाल उमेदवार – मिळालेली – टक्केवारी
दीपक चव्हाण (राष्ट्रवादी) ११७६१७ – ५४.५५%
दिगंबर आगवणे (भाजप) ८६६३६ – ४०.१८%
अरविंद आढाव – (वंबआ ५४६०) – २.५३%