मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सर्वेबाबत अंगणवाडी, आशा सेविका आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मानधन वाढ झाली नसल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका व गटप्रर्वतक आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी जो पर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आपल्या संपावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. राज्य शासनाच्या मराठा समाज आरक्षण सर्वेक्षणावर बहिष्काराचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याबाबत तालुका पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटना (सीटू) आणि सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेच्या अध्यक्षा काॅ. आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली दि. ४ डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने मानधन वाढ हा विषय आहे.

संपाला दीड महिना झालातरी शासनाने मागण्यांवर विचार केलेला नाही. त्यामुळे संघटना संपावर ठाम आहे. त्यामुळे आता संघटनेने मराठा समाज आरक्षण सर्वे करण्यावर बहिष्कार टाकला आहे. त्याचबरोबर आशा सेविकांना ७ हजार आणि गटप्रवर्तकांना १० हजार रुपये मानधन देण्याचे मान्य करुनही याबाबत शासनाने अध्यादेश काढलेला नाही.

त्यामुळे आशा आणि गटप्रवर्तक आंदोलनात आहेत. त्यांनीही शासनाने मागण्याकडे लक्ष दिले नसल्याने मराठा समाज आरक्षण सर्वेवर बहिष्कार टाकला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हा बहिष्कार राहील, असा इशाराही देण्यात आलेला आहे.