कराड प्रतिनिधी | महामार्ग प्राधिकरण व तासवडे टोलप्रशासनाबरोबर सर्वपक्षीय स्थानिकांची टोलमाफी संदर्भात वादळी बैठक झाली. या बैठकीत महामार्ग प्राधिकरणाकडून तासवडे टोलनाकाच्या दहा किलोमीटर परिघातील सर्व स्थानिकांना दोन महिने टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, कायमस्वरूपी टोलमाफी मिळावी यावर स्थानिक ठाम आहेत. दरम्यान, दोन महिन्यांनी पुन्हा आमच्यावर टोलची सक्ती केली तर पहिल्यांदा तासवडे टोलनाका जिल्ह्याच्या हद्दीवर न्या आणि मगच आमच्यावर टोलची सक्ती करा, असा इशारा देत स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. बैठकीत अधिकाऱ्यांवर स्थानिकांनी अक्षरशः प्रश्नांचा बडीमार केला.
महामार्गाचे हस्तांतर झाल्यानंतर नवीन आलेल्या टोल व्यवस्थापनाने स्थानिकांकडून टोल घेतला जात होता. या विरोधात स्थानिकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत सोमवारी कराड येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, टोल प्रशासनाचे अधिकारी, पोलीस प्रशासन आणि सर्वपक्षीय स्थानिक उपस्थित होते. यावेळी बैठकीत सर्वपक्षीय स्थानिकांनी गेल्या वीस वर्षापासून आम्हा स्थानिकांना टोलमाफी होती. आमच्याकडून कधीही टोल घेतला नाही. परंतु नवीन आलेल्या टोल प्रशासन आमच्याकडून टोल घेत आहे. तसेच मासिक पासाची सक्ती करत आहेत. तो आम्हाला मान्य नाही. आमची महामार्गाच्या रुंदीकरणांमध्ये जमीन गेली आहे. व्यवसाय उधस्त झाले आहेत. टोलनाक्यावरून आम्हाला अनेक वेळा जावे लागते.
त्यामुळे स्थानिकांसाठी पूर्वीची टोलमाफीची सवलत कायम ठेवावी स्थानिकांचा टोल घेण्यात येऊ नये अशी आक्रमक भूमिका घेतली. तसेच स्थानिकांसाठी टोल नाक्यावर वेगळ्या दोन लेन ठेवण्याची मागणी केली. बैठकीत स्थानिकांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांवर अक्षरशः प्रश्नांचा बडीमार केला. टोलनाका जिल्ह्याच्या हद्दीवरू न्यावा. अन्यथा या विरोधात स्थानिकांचा संचालकांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत दोन महिन्यांनी टोलनाक्याचे आधुनिकीकरण होणार आहे. तोपर्यंत तासवडे टोलनाक्याच्या दहा किलोमीटर परिघातील सर्व स्थानिकांना पूर्वीप्रमाणेच टोलमाफी देण्यात येईल, असा निर्णय जाहीर घेतला. दरम्यान निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वपक्षीय स्थानिकांनी जर दोन महिन्यांनी पुन्हा टोलची किंवा मासिक पासाची सक्ती करणार असाल तर तासवडे येथील टोलनाका येथून हलवा असा आक्रमक पवित्रा घेतला.