सातारा प्रतिनिधी । कधी कधी आपण घाई गडबडीत एखादी अशी कृती करतो कि ती एकदा आपल्या जीवानिशी येते. अशीच कृती महाबळेश्वर येथील एका युवकाने केली आहे. ज्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.ज्या हाताने उंदीर मारण्याकरिता विषारी औषध घातले व त्याच हाताने तंबाखू मळून खाल्यामुळे विषबाधा होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
उमेश धोंडिबा ढेबे (वय 26, रा. शिंदी, महाबळेश्वर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. महाबळेश्वर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वर येथील शिंदी गावातील उमेश धोंडीबा ढेबे या युवकाने उंदीर मारण्यासाठी शनिवार, दि. 1 रोजी दुपारी औषध टाकले होते. त्याच हाताने तंबाखू खाल्ल्याने पहाटे तीन वाजता पोटात दुखू लागले. त्यामुळे त्यांना प्रथम उपचारासाठी कंळबणी या ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.
तेथून अधिक उपचाराकरिता रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच ठिकाणी मंगळवार, दि. 4 रोजी उपचारादरम्यान उमेश ढेबे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या मृत्यूची अधिक चौकशीसाठी रत्नागिरी पोलिस ठाण्यातून दि. 4 रोजी अन्वये दाखल होऊन टपालाने सोमवार, दि. 17 रोजी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. ही घटना महाबळेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गणेश धोंडीबा ढेबे (रा. शिंदी) यांनी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.