सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील प्रसिद्ध असलेल्या फुटक्या तलावातील हजारो मासे आज, बुधवारी सकाळी अचानक मृत्युमुखी पडले आहेत. या घडलेल्या प्रकारानंतर पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी काही नागरिकांच्या मदतीने तलावातील मृत पावलेले मासे तात्काळ बाहेर काढले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फुटके तळे आहे. या तळ्यात मोठ्या संख्येने मासे आहेत. बुधवारी सकाळी फुटक्या तलावात मासे मृत्युमुखी पडल्याचे येथिक नागरिकांना दिसून आले. त्यांनी तात्काळ याची माहिती सातारा पालिकेतील कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळाल्यानांतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृत माश्यांचे तलावातून बाहेर काढले. तब्बल दोन ट्रॉली माशांची विल्हेवाट पालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोत लावण्यात आली.
तलावातील मासे मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडण्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे नागरिकांमधूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मृत मासे पाहण्यासाठी सकाळी नागरिकांची तळ्याभोवती गर्दी जमली होती. दरम्यान, पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची चांगलीच चर्चा सध्या सातारा शहरात सुरु आहे.