सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कलेढोण येथील तरुण सर्पमित्र महेश दत्तात्रय बाबर (वय ३२) या युवकाचा नाग चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या आकस्मिक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कलेढोण कुटीर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महेशचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत ग्रामस्थांसह नातेवाईकांनी तीव्र संताप केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, विखळे येथील शिवारात शनिवारी सायंकाळी नाग निघाला होता. त्यानंतर येथील स्थानिक नागरिकांनी सर्पमित्र महेश बाबर यांना फोन करून बोलावून घेतले असता, बाबर यांनी तातडीने जाऊन त्या नागास पकडले. त्यानंतर त्या नागाला त्याच्या अधिवासात सोडून देण्यासाठी पोत्यात भरत असताना नागाने अचानक बाबर यांच्या बोटास चावा घेतला. त्यानंतर बाबर यांनी कलेढोण येथील कुटीर रुग्णालयात त उपचारासाठी धाव घेतली. मात्र, त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने तेथील नर्स यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. यानंतर महेश बाबर यांना अस्वस्थ होऊ लागल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून कलेढोण येथून जिल्हा रुग्णालय सातारा या ठिकाणी हलवण्यात आले.
परंतु कातरखटाव दरम्यान रुग्णाची प्रकृती गंभीर झाली. त्याबाबत कलेढोण कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना नातेवाईकांनी कळवले असता त्यांनी रुग्णवाहिका वडुज येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले, परंतु सदर ठिकाणी न जाता रुग्णवाहिका सरळ औंध येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आली. त्या ठिकाणी सर्प विष प्रतिबंधक लस दिली गेली. मात्र, रुग्णाची अवस्था चिंताजनकच होऊ लागली. अखेर रात्री ९.३० च्या सुमारास जिल्हा रुग्णालय सातारा येथे पोहचल्यानंतर बाबर यांना मृत घोषित केले.
महेश काही दिवसापूर्वी गावाकडे परतला होता
सकाळी सातारा जिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. कामानिमित्त पुण्याला असणारा महेश काही दिवसापूर्वी गावाकडे परतला होता. घरात आई, मोठा भाऊ व विवाहित बहीण असलेल्या महेशच्या वडिलांचे या अगोदरच निधन झाले. त्यांच्या पाठोपाठ कर्त्या महेशचानागपंचमी सण पार पडताच सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याने बाबर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रविवारी महेश याच्यावर शोकाकुल वातावरणात गावी अंत्यसंस्कार ‘करण्यात आले.