सातारा प्रतिनिधी | आईच्या डोळ्यादेखत १८ वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना माण तालुक्यात घडली आहे. तो साताऱ्यातील मूकबधीर विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता.
शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेलेला १८ वर्षाचा मूकमधीर मुलगा बंधाऱ्यात बुडाल्याची घटना माण तालुक्यातील म्हसवडमध्ये घडली आहे. हणमंत मोहन शेंबडे (वय १८, रा. शेंबडेवस्ती-म्हसवड) असं मृत मुलाचं नाव आहे. दुर्दैव म्हणजे ही घटना त्याच्या मूकबधीर असलेल्या आईच्या डोळ्यासमोर घडली आहे. मूकबधिर असल्याने मुलगा आणि आईला आरडाओरडाही करता आला नाही.
गणेशोत्सवाच्या सुट्टीसाठी आला होता गावी
हणमंत मोहन शेंबडे हा मुकबधीर विद्यार्थी साताऱ्यातील मुकबधीर विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. गणेशोत्सव मुळे तीन चार दिवस सुट्टी असल्याने तो गावी झाला होता. रविवारी दुपारी तो आईसोबत शेतातील मोटार चालू करण्यासाठी गेला होता. त्याची आईसुद्धा मुकबधीर आहे. माणगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं दोरखंडाच्या सहाय्याने नदी पार केल्याशिवाय शेतात जाता येत नव्हतं.
दोरखंड निसटल्याने पाण्यात गेला वाहून
आईला नदीच्या काठावर उभे करून तो दोरखंडाच्या सहाय्याने नदीपार करत होता. नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर हणमंतच्या हातातून दोरखंड निसटला आणि तो नदीच्या पाण्यात वाहत गेला. मुलगा वाहून जात असल्याचे पाहून मूकबधीर आईला ओरडता देखील आले नाही. म्हणून आईने पळत घर गाठून वडीलांना माहिती दिली. प्रशासनाला ही माहिती कळवताच पोलीस आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत पाण्यात बुडालेल्या हणमंतचा शोध सुरू केला. रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
आमदार जयकुमार गोरेंची घटनास्थळी धाव
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच भाजपाचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, डीवायएसपी उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास आहिर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार, मंडलाधिकारी, तलाठी घटनास्थळी दाखल झाले. आ. गोरे यांनी बुडालेल्या मुलाचा शोध घेण्याची सूचना प्रशासनाला केली. त्यानुसार आपत्ती निवारण कक्षाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क सपर्क साधून त्याना टीम पाठविण्यास सांगण्यात आले. सोमवारी सकाळी रेस्क्यू टीमच्या साह्याने मुलाचा शोध घेण्यात येणार आहे.