सातारा प्रतिनिधी | अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्यापासून काही अंतरावर अल्पवयीन मुलीचा सडलेल्या अवस्थेत तर त्याच परिसरात झाडावर बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरूणी ही सातारा परिसरातील असून तिने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच ती एक महिन्यांपासून बेपत्ता होती.
उग्र वासामुळे घटना उघडकीस
अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्याच्या बाजूकडून उग्र वास येत असल्याचे काही पर्यटकांच्या लक्षात आले. त्यानुसार काही जणांनी आजुबाजुला पाहिले असता सडलेल्या अवस्थेत एका मुलीचा मृतदेह आणि त्याच ठिकाणी झाडावर बिबट्या मृतावस्थेत आढळला. या घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी काही वस्तू मिळून आल्या.
वस्तुंवरून बेपत्ता मुलीची ओळख पटली
सातारा शहर पोलिस ठाण्यात बेपत्ताच्या नोंदी पाहताना पोलिसांना एका मुलीचे वर्णन मिळतेजुळते असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता मुलीच्या कुटुंबियांना माहिती देवून घटनास्थळी नेले. मुलीचे कपडे, पैंजण तसेच इतर वस्तूंची ओळख पटली आणि तो मृतदेह मृत तरूणीचाच असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, मुलींच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतर समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी वैद्यकीय अधिकार्यांना तेथे पाचारण केले. पोलीस निरीक्षक राजेेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू आहे.
फांदीत अडकल्याने बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू?
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह झाडावरुन खाली घेतल्यानंतर ते ७ ते ८ महिन्याचे बिबट्याचे पिल्लू असल्याचे स्पष्ट झाले. झाडाच्या फांदीत अडकल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाजही वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.