सातारा प्रतिनिधी | जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2025-26 चा पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठीची राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे पार पडली. यावेळी सातारा जिल्हा नियोजन विभागाचा कमाल नियतव्यय 486 कोटी 25 लाखांचा असून अतिरिक्त मागणी 238कोटी 75 लाखांची आहे. या सर्व मागणीचा सविस्तर आढावा घेऊन भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली.
यावेळी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भासले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आ. महेश शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, गतवर्षी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 18 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. यावर्षी हा निधी वाढवून 20 हजार कोटी रुपये करण्यात येणार आहे. त्यामुळे वाढीव निधीच्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्याला निधी वाढवून देण्यात येईल. पण दिलेला सर्व निधी विहित मुदतीत, गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च होईल याची काटेकोर दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यांचा जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2025- 26 चा अंतिम अर्थसंकल्पित नियतव्यय हा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर कळवण्यात येतो. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून चालू वर्षाच्या तुलनेत कमी नियतव्यय असला तरी सातार्याच्या अतिरिक्त मागणीप्रमाणे जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ना. पवार यांनी सांगितले. महिला बचतगटांसाठी उभारण्यात येणारा मानिनी मॉल, दुष्काळी भागातील सौरऊर्जा प्रकल्प यासह विविध प्रकल्पांची माहिती ना. पवार यांनी घेतली.
यावेळी सातार्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कृषी पर्यटनामध्ये थीम आधारित गावे विकसित करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, निर्यातक्षम फळबाग उत्पादन प्रकल्प, डे केअर केमोथेरपी युनिट, महिला केंद्रित कर्करोग अभियान या उपक्रमांची माहिती दिली. दरम्यान, यावेळी ना. जयकुमार गोरे यांनी सोलापूरसाठी 200 कोटींचा निधी वाढवून देण्याची मागणी केली.तसेच सन 2024-25 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 60टक्के निधी प्राप्त झालेला असून उर्वरित 40 टक्के निधी लवकरात लवकर देण्याची मागणीही त्यांनी केली.