सातारा प्रतिनिधी | तलवार आणि वाघनखे प्रत्येकाच्या घरात असावी, असे मला वाटते. भाजप नेत्यांना मी तलवार आणि वाघनख भेट देत आहे, याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये. असे असते तर जेव्हा मी राष्ट्रवादी पक्ष सोडला तेव्हाच तलवार, वाघनखं भेट दिले असते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी अभिनंदन केले असून, लवकरच त्यांना देखील तलवार आणि वाघनख भेट देणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना म्हंटले.
कास धरण ते सातारा सुमारे २७ किलोमीटर लांब नवीन जलवाहिनीचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी या कामाचे उद्घाटन खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सातारा जिल्ह्यात आजपर्यंत अनेक चळवळी उभ्या राहिल्या आहेत. या जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. जिल्ह्याला जर मंत्रीपद मिळालं तर जिल्ह्याचा विकास अधिक गतीने होईल. परंतु मंत्रिपद कोणाला मिळेल हे मी नाही सांगू शकत.
उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा असल्याने याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, पद कोण सांभाळतं याला फारसे महत्त्व नाही. लोकांची कामे होणे महत्त्वाचे आहे. माझ्या मंत्रिपदाबाबत अफवा आहेत. मी माझे काम करत असतो. मंत्रिपद मिळावे, असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. जिल्ह्याला आणखी लोकप्रतिनिधित्व मिळाले, तर अजून कामे होतील; पण ते कुणाला द्यायचे आणि कुणाला नाही हे माझ्या हातात नाही आणि मंत्रिपदासाठी मी का कोणाचे नाव सांगू. उद्या मी म्हणेन मला मंत्रिपद द्या; पण मला त्यात इंटरेस्ट नसल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.