अजितदादा-आनंदराव नानांची भेट, मग चर्चा तर होणारच!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कराड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. काही दिवसांपूर्वीच आनंदराव नानांनी पुण्यात अजितदादांची भेट घेतली होती. नाना लवकरच अजितदादा गटात प्रवेश करणार अशी देखील चर्चा ऐकायला मिळत होती. त्यामुळे आज दादा आणि नानांच्या झालेल्या भेटीची चर्चा तर होणारच.

राष्ट्रीय युवक काँग्रेस पासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आनंदराव नानांनी अनेक वर्षे सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्ती म्हणून गेली अनेक वर्षे ते परिचित होते. त्यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर आजपर्यंत ते न्यूट्रल आहेत. सध्या त्यांची भाजपच्या नेत्यांशी जवळीक पाहायला मिळते. मात्र, अधिकृतरित्या त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही.

अनेक वर्षे सत्तेसोबत राहिलेले आणि मानमरातब मिळालेल्या आनंदराव नानांना कॉंग्रेसपासून दूर जावे लागले. त्यामुळे साहजिकच पुढचा निर्णय ते विचारपूर्वकच घेतील. कॉंग्रेसमध्ये सक्रिय असताना त्यांनी आपला मुलगा प्रताप यास सुपने जिल्हा परिषद गटातून निवडणुकीत उतरवले. परंतु, विलासकाका उंडाळकर समर्थक उमेदवार प्रदीप पाटील यांनी त्याचा पराभव केला. तेव्हापासून आनंदराव पाटील बॅकफूटवर गेले.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून दुरावल्यानंतर आनंदराव पाटील हे राजकारणातून बाजूला पडल्यासारखे वाटत होते. मात्र, त्यांनी भविष्यातील राजकीय घडामोडींचा अंदाज घेऊन आपले सुपूत्र प्रताप याला भाजप नेत्यांच्या वर्तुळात नेले. तथापि, स्वतः मात्र आपली भूमिका जाहीर केली नाही. यासंदर्भात प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला तर आजही आनंदराव पाटील हे ‘लवकरच तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल’, असं म्हणतात. परंतु, अजून नानांच्या भुमिकेचं उत्तर मिळालेलं नाही.

राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात प्रवेश करणार?

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांच्याशी आनंदराव पाटील यांची वाढलेली जवळीक पाहता आनंदराव नाना अजित दादांसोबत जाणार का? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे, हे नक्की. तूर्तास अजित दादा आणि आनंदराव नाना यांच्या सदिच्छा भेटीची चर्चा मात्र होत राहणार.