सातारा जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणीचे काम चांगल्या पद्धतीने सुरु : विभागीय आयुक्त सौरभ राव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । 18-19 या वयोगटातील जे तरुण आहेत. अशा मतदारांची नोंदणी करण्यासाठी 2004 ते 2006 या कालावधीतील जन्म झालेल्या नागरिकांची यादी तयार करावी. तसेच जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी शाळा व महाविद्यलयांमध्ये शिबीराचे आयोजन करावे. त्याचबरोबर छोट्या जाहिराती व स्लोगन तयार करुन प्रसिद्धी करावेत. सातारा जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणीचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असून याचे समाधान वाटते, असे मत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केले.

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्याचे मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांची जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी, मतदार नोंदणी अधिकारी व राजकीय पक्षांचे अध्यक्ष व प्रतिनिधी याची आज बैठक पार पडली. या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे व धैर्यशिल कदम यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सातारा जिल्हा लोकसभा संघांतर्गत आठही विधानसभा मतदारसंघातील नव मतदार नोंदणी, मयत, दुबार, स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले की, राजकीय पक्षांनी त्यांचे बीएलए यांच्या नेमणुका कराव्यात. मतदार यादीतील मयत, दुबार, स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याबाबत भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. मयत मतदारांची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्राप्त करुन घ्यावी. स्थलांतरित मतदारांना नोटीस देवून पुरव्याचे कागदपत्रांची तपासणी करुन वगळणी करण्यात यावी.