सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाने अर्थसंकल्पात महिलांसाठी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, ‘अन्नपूर्णा’ इत्यादी योजनांचे लाभ सातारा जिल्ह्यातील महिलांना मिळवून देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. या योजनांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी आणि जनजागरण मोहिमेसाठी पक्षाचे कार्यकर्ते बूथनिहाय उपलब्ध असतील, अशी ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
साताऱ्यात भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, कार्यकारिणी सदस्या सुनिशा शहा, रेणू येळगावकर उपस्थित होत्या.
धैर्यशील कदम म्हणाले, महिलांचे आरोग्य रक्षण आणि पर्यावरण संवर्धन साध्य करण्यासाठी राज्य शासनाने ‘अन्नपूर्णा’ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत वर्षाकाठी तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. महिला व तरुणींना दरमहा पंधराशे रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना शासनाने जाहीर केली आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या योजनांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता आणि योजनांचे लाभ कसे मिळवायचे, याची माहिती देण्यासाठी पक्षाच्यावतीने जनजागरण मोहीम राबवण्यात येणार आहे. याकरिता शासकीय यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे. या योजनांचे लाभ मिळवण्यासाठी महिलांनी त्या त्या क्षेत्रातील बूथप्रमुख अथवा मंडलप्रमुखांशी संपर्क साधून, योजनांची कागदपत्रे नागरी सुविधा केंद्रांमध्ये योग्य पद्धतीने दाखल करण्याची काळजी घ्यावी, अशा सूचना कदम यांनी यावेळी केल्या.