कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांचा प्रचार शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खंडोबाची पाल येथे बुधवारी ६ रोजी दुपारी एकच्या सुमारास होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सभा या निमित्ताने होत असल्याची माहिती भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी उंब्रज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महायुतीचे कराड उत्तरचे उमेदवार मनोज घोरपडे, निवडणूक समन्वयक रामकृष्ण वेताळ, भीमराव पाटील, संपतराव माने, वासुदेव माने, सुरेश पाटील, अंजलीताई जाधव, महेशबाबा जाधव, सरपंच योगराज जाधव, शंकरराव शेजवळ, प्रमोद गायकवाड, सीमा घार्गे, विलास आटोळे तसेच शिवसेना, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कदम म्हणाले, प्रथमच भारतीय जनता पार्टीला कराड उत्तर. विधानसभा मतदारसंघ सोडण्यात यश आले असून संपूर्ण महायुतीची ताकद कराड उत्तरच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे. आमच्यात कोणतेही अंतर्गत मतभेद नाहीत. त्यामुळे विद्यमान आमदार हटवण्यासाठी महायुतीने ताकदीने काम करावे.
पाल येथे परंपरेनुसार महायुतीच्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रचार शुभारंभ होत आहे. त्यांची तयारी पाल येथे सुरू असून या अनुषंगाने उत्तर मतदार संघातील बुथ कमिटसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. सभेला लाडक्या बहिणींसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते पाल येथे उपस्थित राहणार आहेत.
मनोज घोरपडे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रचार शुभारंभ होत असल्याने भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी विशेष विशेष लक्ष या मतदारसंघावर ठेवले असून त्यामुळे येथील विद्यमान आमदार हटवण्यासाठी जनता मोठ्या ताकदीने काम करेल व परिवर्तन घडवेल. मी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक समन्वयक आहे. या माध्यमातून उत्तरमधील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अधिकाधिक मते महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाल येथील सभा म्हणजे विजयाची नांदी असून कराड उत्तरमध्ये यावेळी परिवर्तन निश्चित असल्याचे रामकृष्ण वेताळ यांनी म्हटले.