कराड प्रतिनिधी । “कराड उत्तर विधानसभा मतदार संघात ग्रामपंचायतीने त्यांच्या चौदाव्या वित्त आयोगातून जी कामे केली ती सुद्धा विद्यमान आमदारांच्या विकासकामांच्या यादीत आहेत. अडीच वर्षे यांच्या सत्तेची मस्ती अख्ख्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघाने बघितली आहे. अडीच वर्षात या विद्यमान आमदारांनी आमचे काही उद्योगधंदे बंद पाडले, कुणाच्या मागे पोलीस लावले हे सुद्धा आम्ही बघितले आहे. महिलांना पैशांचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप आमच्यावर करणाऱ्या आमदारांनी अडीच वर्षे सत्तेत असताना तसेच पालकमंत्री असताना पंधरा रुपये तरी महिलांना दिले का? असा सवाल करीत भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी शरदचंद्र पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर टीका केली.
कराड उत्तर भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून आज भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, सागर शिवदास यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिरवडे गावास भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी, महिलांनी परिवर्तन यात्रेचे उत्साहात स्वागत केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी धैर्यशील कदम म्हणाले की, आज हि परिवर्तन यात्रा कशासाठी काढली हे शिरवडे ग्रामस्थांनी लक्षात घेतले पाहिजे, परिवर्तन यात्रा काढण्याची का गरज पडली? आज अनेक कार्यकर्ते आमच्याकडे येतात आणि विकास कामासाठी निधी मागतात.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघात एकाच घरामध्ये गेली २५ वर्षे आमदारकी आहे आणि ती नॉनस्टॉप आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासारखा जुना कारखाना ताब्यात आहे. मग शिरवडेतील ग्रामस्थ आमच्याकडे विकासकामे का मागत आहेत? तुम्ही तर म्हणता कि, कराड उत्तरच्या आमदारांनी खूप विकास केला आहे राजकारण कधीच केले नाही. मग हि गावात झालेली विकासकामे कुठली आहेत. अडीच वर्षे मंत्रीपद तसेच राज्यातील सत्ता असताना यांनी किती विकासकामे केली हे सांगावे. विद्यमान आमदारांनी अडीच वर्षात एक पूल बांधण्याशिवाय काय काम केले नाही. हणबरवाडी- धनगरवाडी योजना पूर्ण केली का? शामगावला पाणी दिले का? पालकमंत्री असताना यांचे काम होते कि त्यांनी शामगावला पाणी द्यायला पाहिजे होते. आता कुणी शामगावला पाणी दिले तर ते भाजपने दिले आहे. विद्यमान आमदारांनी जि कामे केली नाहीत ती आम्ही आमदार, खासदार नसताना देखील केली असल्याचे जिल्हाध्यक्ष कदम यांनी म्हंटले.
महेश शिंदेंनी जे करून दाखवले ते बाळासाहेब पाटलांना जमले नाही
पंचवीस वर्षाच्या काळात साडे सतरा वर्षे सत्तेत आमदार असताना देखील बाळासाहेब पाटील यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघात विकासकामे केली नाही. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात गावागावात सिमेंट, काँक्रीटचे रस्ते केले आणि अनेक विकासकामे केली. मग कराड उत्तरच्या विद्यमान आमदाराने का केली नाहीत? असा सवाल जिल्हाध्यक्ष कदम यांनी बाळासाहेब पाटील यांचे नाव न घेता उपस्थित केला.