सातारा प्रतिनिधी | रत्नागिरी आणि सातारा जिह्यांना जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटात रस्त्याला भगदाड पडले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावासह साताऱ्यातील 40 गावांचा संपर्प तुटला आहे. त्यामुळेच जीव धोक्यात घालून सध्या स्थानिक या घाटातून प्रवास करत आहेत. यावरून ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. ‘लाडक्या बहीण भावांच्या लेकरांना असलेला धोका तुम्हाला दिसत नाही का?, मुख्यमंत्री त्यांच्या गावाकडे जाणारा रस्ताही नीट करू शकत नाहीत का?, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
रघुवीर घाट हे पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर आहे. शेकडो पर्यटक या घाटात येत असतात. पावसाळ्यात ही संख्या मोठी असते. त्यातच चारच दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे घाटातील दरीकडील भाग खचल्याने सातारा जिह्यातील 40 गावांचा संपर्क तुटला आहे. साताऱ्यातील शिंदी, वळवण, चाट, वाधावळे, लामज, मोरनी, आरव, अकल्पे, तापोळासह 40 गावांचा संपर्प खेड आणि चिपळूण तालुक्यांशी येतो. हे ग्रामस्थ बाजारहाट करण्यासाठी नियमितपणे रघुवीर घाट मार्गे प्रवास करतात. मात्र रस्ता खचल्याने या 40 गावांची काsंडी झाली आहे. रघुवीर घाटातील खचलेल्या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.
सरकार जाहिरातबाजीवर करोडो रुपये खर्च करत आहे; पण जनतेच्या जिवाचे सरकारला काहीच पडलेले नाही, असे नमूद करतानाच जो मुख्यमंत्री स्वतःच्या गावाला जोडणारा रस्ता नीट करू शकत नाही त्यांनी विकासाच्या बाता करू नयेत, असे खडेबोल या परिसरातरील गावकऱ्यांनी सुनावले. रघुवीर घाटात दुर्घटना घडून जीवितहानी झाली तर त्याला पूर्णपणे मुख्यमंत्री आणि सरकार जबाबदार असेल, असेही ग्रामस्थांनी ठणकावले आहे.