सातारा प्रतिनिधी । उत्तर प्रदेश प्रयागराज येथील महंत साधूंच्या उपस्थितीने पवित्र बनलेला महाकुंभमेळा सध्या सुरू आहे. या पवित्र सोहळ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी या सोहळ्यात महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करून या सोहळ्यात मी सहभागी झाले हे माझे सौभाग्य आहे, असे मत दमयंतीराजे यांनी व्यक्त केले.
कुंभमेळ्यातील महंत साधूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. प्रयागराज येथील कुंभमेळा दर बारा वर्षानी भरतो. या कुंभमेळा मध्ये सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक येतात. साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांचे समर्थक पंकज चव्हाण हे सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांचे प्रयागराज येथील कुंभमेळ्यात संत महंतांनी उत्साही वातावरणात स्वागत केले. शाही स्नानासाठी त्यांना रथावर आरूढ करून नेण्यात आले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवराय’चा जयघोषही उपस्थितांमधून होत होता. लाखोंच्या संख्येने जमलेल्या गर्दीच्या मनात छत्रपतींच्या घराण्याविषयीचा आदरभाव यावेळी दिसून आला.
छत्रपती घराण्यातील स्नुषा श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांना प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये आयोजित शाही स्नानासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रम स्थळी दमयंतीराजे पोहोचताच जमलेल्या लाखो संख्येच्या जनसमुदायाने छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती उदयन महाराजांचा विजय असो, असा जयजयकार केला. तेथे अनेक मान्यवर महंतांच्या उपस्थितीत दमयंतीराजे भोसले यांनी महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक केला.