जिल्ह्यातील ‘या’ गावातील शेतकऱ्यांच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीचे नुकसान; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शेतकरी काबाडकष्ट करून पीक पिकवतो. नंतर ते बाजारात घेऊन त्याची विक्री करतो. मात्र, त्याच्या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर तो खचून जातो. मग कष्टानं पिकवलेला पीक तो डोळ्यादेखत नष्ट करतो.अशी वेळ जावळी तालुक्यात प्रामुख्याने कुडाळ, आखाडे सोमर्डी, महू, शिंदेवाडी आदी गावांतील शेतकऱ्यावर आली आहे. स्ट्रॉबेरीचा हंगाम संपण्यास अजून दोन महिने कालावधी असून देखील कंपन्या केवळ वीस ते तीस रुपये दराने खरेदी करीत असल्याने स्ट्रॉबेरी रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.

जावळी तालुक्यात प्रामुख्याने कुडाळ, आखाडे सोमर्डी, महू, शिंदेवाडी आदी गावांतील शेतकऱ्याकडून स्ट्रॉबेरीचे पीक घेतले जाते. साधारणपणे २० ते २२ हेक्टर जमिनीवर सप्टेंबर महिन्यात स्ट्रॉबेरी पिकाची लागण होते. डिसेंबर महिन्यापासून हा हंगाम सुरू होत आहे. पुणे, मुंबई, तसेच जॅमचे चॉकलेट तयार करणाऱ्या कंपनीकडून याची मागणी होते. मात्र, स्ट्रॉबेरीचा दर कोसळला असल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक संकटात सापडला आहे. याचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसणार आहे.

सध्या स्ट्रॉबेरीला जॅमच्या कंपनीतून मागणी कमी झाली असल्याने स्ट्रॉबेरीचे दर २० ते ३० रुपयांवर आले आहेत. अचानकपणे स्ट्रॉबेरीचा दर कोसळल्याने शेतकऱ्यांना तोडून ठेवलेला स्ट्रॉबेरी माल फेकून द्यावा लागला आहे. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्ट्रॉबेरी या पिकाला कोणत्याही प्रकारचे विमा कवच नसल्याने या नुकसानीची दाद कोणाकडे मागावी, असा सवाल शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना पाणी पुरेल का नाही, अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली असतानाच स्ट्रॉबेरी पिकाचे दर पडल्याने शेतकऱ्याला अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागणार आहे. परिणामी अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी पिकी घ्यावे कि नाही? असा विचार केला जात आहे.