सातारा प्रतिनिधी । गायब झालेला मुलगा मीच असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांद्वारे वृद्ध महिलेची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा दहिवडी पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला आहे. संबंधित भोंदूबाबाचे नाव एकनाथ रघुनाथ शिदे (रा.ओझर बुगा, ता. जामनेर, जि. जळगाव) असे असून, त्यास शिंदी बुद्रुक (ता. माण) येथून जेरबंद करण्यात आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असलेल्या शिंदी बुद्रुक गावातील व्दारकाबाई विष्णू कुचेकर यांचा मुलगा सोमनाथ हा इयत्ता 8 वी मध्ये असताना 1997 साली घरातून निघून गेला. आपला मुलगा कधी तरी परत येईल, या आशेवर ती जगत होती. मागील नऊ-दहा वर्षांपासून एकनाथ शिंदे हा भोंदूबाबा भिक्षा मागण्यासाठी गावात येत होता. या दरम्यान त्याने व्दारकाबाईच्या कुटुंबाची आणि मालमत्तेची माहिती घेतली. तिचा मुलगा घर सोडून गेला असून तिला तीन एकर जमीन असल्याची त्याला माहिती मिळाली.
त्यानंतर त्याने वृद्धेला वरचेवर भेटून मीच तुमचा मुलगा असल्याचे भासवले. अशातच 9 डिसेंबर 2023 रोजी वृद्धापकाळाने द्वारकाबाई यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी 27 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांचे वर्षश्राद्धही घातले. त्यानंतर मुलगा या नात्याने 11 डिसेंबर 2024 ला तिचे वर्षश्राद्ध घालण्याचा निर्णय भोंदूबाबाने घेतला. ही याबाबतची माहिती समजताच नातेवाईक त्याठिकाणी पोहोचले. त्यांना भोंदबाबाचा संशय आला. त्यानंतर नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नंतर दहिवडी पोलिसांनी भोंदूबाबाला ताब्यात घेतले. खाक्या दाखवताच भोंदूबाबाने आपली खरी ओळख सांगितली. एकनाथ रघुनाथ शिंदे असे आपले खरे नाव असल्याचे त्याने सांगितले तसेच व्दारकाबाईच्या नावे असलेली तीन एकर जमीन बळकावण्याच्या हेतूने तिचा मुलगा सोमनाथ कुचेकर याची कागदपत्रे काढली. त्याचा फोटो, नाव, पत्ता वापरुन आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खाते, एटीएम काढल्याची कबुलीही दिली. या सर्व तपास आणि चौकशीनंतर दहिवडी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी गुन्हा दाखल करून भोंदूबाबाला अटक केली.