कराड प्रतिनिधी | दादर ते पंढरपूर विशेष रेल्वे सेवा आता साताऱ्यांपर्यंत विस्तारीत करण्यात आली आहे. शनिवार (दि.१६) रोजी पासून ही रेल्वे सुरू होत आहे असून त्यादिवशी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी ही गाडी साताऱ्यातून मार्गस्थ होऊन दादरला पोहचेल. सोमवार, मंगळवार व शनिवार या दिवशी साताऱ्याहून दादरकडे जाईल तर रविवार, सोमवार आणि शुक्रवार दादरहून सुटुन साताऱ्याला येईल, अशी माहिती रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र‘शी बोलताना दिली.
दादरवरुन पंढरपुरला सोलापुर मार्गे रेल्वे सुरु होती. ती रेल्वे दादरवरुन ठाणे, कल्याण, लोणावळा, तळेगाव, चिंचवड, पुणे, उरळी, केडगाव, दौड, भिगवन, जेऊर, कुर्डुवाडी या मार्गे पंढरपूरपर्यंत येत होती. मात्र, त्याचा सातारा, सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना, भाविकांना फायदा होत नव्हता. त्याचा विचार करुन रेल्वे सल्लागार समिती सदस्य तिवारी यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे ती रेल्वेसेवा साताऱ्यापर्यंत वाढवण्याची मागणी केली होती.
त्यानुसार ती रेल्वे दादरवरुन पंढरपुरवरुन मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कऱ्हाड, मसूर, कोरेगावमार्गे सातारा अशी करण्यात आली आहे. ही रेल्वे शनिवारपासुन ट्रकवर येणार आहे. साताऱ्यावरून शनिवारी दुपारी ३ वाजून २० मिनीटांनी सुटून मिरज, सांगोला, पंढरपूर मार्गे दादरला पहाटे साडेसहा वाजता पोहचेल.
दरम्यान, सातारा, सांगली जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होवुन मुंबईला जाण्यासाठी आणखीन एक गाडी उपलब्ध होणार आहे. ही गाडी आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार व शनिवार या दिवशी साताऱ्याहुन दादरकडे जाईल तर रविवार सोमवार आणि शुक्रवार दादरहून सुटुन साताऱ्यापर्यंत येईल. त्याचा प्रवाशांनी व भाविकांनी लाभ घ्यावा, असे, आवाहन केले असल्याचे श्री. तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
खा. श्रीनिवास पाटील यांनी केली होती रेल्वे मंत्र्याकडे मागणी
खासदार श्रीनिवास पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी इंदु दुबे यांच्याकडे ती रेल्वे साताऱ्यापर्यंत विस्तारीत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता ही रेल्वेसेवा साताऱ्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.