सातारा प्रतिनिधी । कोल्हापूरहून अयोध्येचा जाणाऱ्या विशेष रेल्वसिस कराडात थांबा मिळावा यासाठी राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांनी नुकतेच रेल्वेमंत्र्यांनी पत्र देखील दिले आहे. त्यांच्याप्रमाणे अजून एका खासदाराने गेल्या ७५ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या एका एक्स्प्रेसच्या (Indian Express) मागणीचा प्रश्न मार्गी लावला आहे. सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांची गेल्या 75 वर्षांपासून सांगली, सातारा जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनवरून पंढरपूरला जाणारी रेल्वे गाडी (Indian Railway) सुरू करण्याची मागणी होती. ही मागणी पूर्ण झाली असून खासदार संजय पाटील यांनी हे प्रयत्न केले आहेत.
सातारा, कराड, सांगली आणि मिरज येथील विठ्ठल भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून (Central Railway) दादर-पंढरपूर गाडीचा व्हाया मिरजमार्गे सातारापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. यामुळे सातारा, सांगली आणि मिरजकरांना मुंबई आणि पंढरपूरसाठी थेट साताऱ्यातून नवी गाडी उपलब्ध झाली आहे.
खा. संजय पाटील यांनी पुढाकार घेत या एक्स्प्रेसची गेल्या 10 वर्षात अनेक पत्रव्यवहार केले. तसेच रेल्वे मंत्र्यांना भेटून वारकऱ्यांसाठी सांगली मार्गे पंढरपूर जाणारी रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर वेळोवेळी खासदारांनी पाठपुरावा केला. पण गाडी सुरू करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी होत्या. त्या सोडवण्यासाठी मध्य रेल्वे सल्लागार समितीचे उमेश शाह व झोनल रेल्वे समितीचे सुकुमार पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. यानंतर अखेर वारकऱ्यांचे गेल्या 75 वर्षांचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. सांगलीहून पंढरपूरला जाणारी रेल्वे गाडी आता सुरु करण्यात आली आहे. पंढरपूर-सांगली-सातारा ही गाडी सुरु करण्याबाबतचा रेल्वे बोर्डाने आदेश काढला आहे.
यावेळी आणि दिवशी सुटणार गाडी
शिवाय मिरज-पंढरपूर मार्गावरील कवठेमहांकाळ-ढालगाव, जत रोड, सांगोला या प्रमुख तालुक्यातील रेल्वे प्रवासी मुंबईशी जोडले जाणार आहेत. ही गाडी सातारा येथून आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार आणि शनिवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटणार असून पंढरपूर येथे रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. मुंबई येथील दादर येथे सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.
‘या’ मार्गे धावणार पंढरपूर एक्स्प्रेस
गाडी क्र 11027/11028 दादर (मुंबई)-पंढरपूर गाडीचा विस्तार सांगली स्टेशन मार्गे सातारापर्यंत करण्यात आला आहे. ही गाडी दादर-मुंबईहून सुटून स्वतःच्या निर्धारित मार्गावरून ठाणे, कल्याण, लोणावळा, चिंचवड, पुणे, उरूली, केडगाव, दौंड, भिगवण, जेऊर, केम, कुर्डूवाडी मार्गे पंढरपूरला येईल. तसेच पंढरपूरहून पुढे सांगोला, मसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमंहांकाळ, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर, कोरेगाव मार्गे साताराला जाईल. साताऱ्याहून परत ताकारी, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, ढालगाव, जत रोड, पंढरपूर, कुर्डूवाडी, केम, जेऊर, भिगवण, दौंड, केडगाव, उरुली, पुणे, चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, ठाणे, मार्गे दादर (मुंबई) पोहोचेल.