डी. पी. जैन कंपनीस 38 कोटी 60 लाखांचा दंड; तहसिलदारांची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील शिरगाव येथे परवान्यापेक्षा जादा उत्खनन केल्याचे महसूल विभागाने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. जादा उत्खनन प्रकरणी डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाख ११ हजार ९०० रुपये दंड कराडच्या तहसीलदारांच्या वतीने ठोठावण्यात आला आहे.

शिरगाव (ता. कराड) येथील एका गटातून डी. पी. जैन कंपनीस ठरावीक मर्यादेपर्यंत गौण खनिजच्या उत्खननास परवानगी दिली होती. मात्र प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन डी. पी. जैन कंपनीने जादाच्या ३८ हजार २१९ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले.

त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने खनिकर्म उपसंचालक यांच्यामार्फत सर्व्हे करुन त्याची तपासणी केली. त्यानंतर त्याचा पंचनामा करण्यात आला. त्यावरुन संबंधित कंपनीस मुदतीत त्यांचा खुलासा मागवण्यात आला होता.

मात्र संबंधित कंपनीने तो खुलासा वेळत दिला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार कल्पना ढवळे यांना दंड करण्याची कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानुसार शिरगाव येथील ३८ हजार २१९ ब्रास जादाच्या, गौण खनिज उत्खनन प्रकरणी तहसीलदार ढवळे यांनी डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाख ११ हजार ९०० रुपये दंड ठोठावला आहे.