शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांना समजावून सांगाव्यात – माजी सनदी अधिकारी डी.एन. वैद्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊन समजून सांगावे व त्याचा लाभ द्यावा, हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी डी. एन. वैद्य यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन सप्ताहनिमित्त गांव की और कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. वैद्य बोलत होते. या कार्यशाळेला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. वैद्य म्हणाले, शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे. नागरिकांचा जास्त करुन महसूल व पोलीस प्रशासनाशी संबंध येतो त्यांना योग्य प्रकारे न्याय द्यावा. तसेच जे काम शासकीय चौकटीतून होत आहे ते काम लवकरात लवकर करावे व जे काम होणार त्याची कारणेही नागरिकांना विश्वासात घेऊन कळवावीत.

योजनेच्या अंमलबजावणी लोकप्रतिनिधी व नागरिकांना विश्वासात घेऊन राबविल्यास त्याची प्रभावी अंमलबजावणी होते, असे सांगून श्री. वैद्य म्हणाले, पुर्वी काम करण्याची व आत्ता काम करण्यात खूप फरक आहे. काळानुसार सर्वसामान्यांचे प्रश्न गतीने सोडविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामात बदल करावे, असेही श्री. वैद्य यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.