पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे, लायन्स क्लबकडून सायबर जनजागृती कार्यशाळा

0
25
karad news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड : सायबर गुन्ह्यांचे जाळे दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, फसवणुकीचे बळी लहान मुले, युवक-युवती, महिला तसेच वृद्ध नागरिक पडत आहेत. मोबाईल व सोशल मीडिया वापरताना सतर्क रहा, असा सल्ला पोलिस उपमहानिरीक्षक (सायबर क्राईम) संजय शिंत्रे यांनी दिला आहे. लायन्स क्लब ऑफ कराड आयोजित ‘सायबर जनजागृती अभियान’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी कराडच्या पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील, कराड लायन्स क्लबचे अध्यक्ष सतीश मोरे, डॉ.विरेंद्र चिखले, खजिनदार दशरथ वाघमोडे, शिवांजली ज्वेलर्सचे उदय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

संजय शिंत्रे यांनी सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार सविस्तरपणे उलगडून दाखवले. डिजिटल अरेस्ट, व्हिडिओ कॉलद्वारे फसवणूक, बँक फ्रॉड, डीप फेक, रोमॅन्स स्कॅम, फिशिंग, ओटीपी फ्रॉड अशा गुन्ह्यांची उदाहरणांसह माहिती दिली. तुमचा सोशल मीडियावरील फोटो हा तुमचा आयडेंटिटी म्हणून वापरला जाऊ शकतो. आधार कार्ड, पॅन कार्ड आदी कागदपत्रांचा गैरवापर टाळण्यासाठी त्यांचे सुयोग्य संरक्षण करा, असे त्यांनी सुचवले. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी त्यांची ओळख पटवावी, असा सल्ला त्यांनी दिला. अनोळखी फोन किंवा मेसेज आल्यास, त्याची माहिती त्वरित आपल्या कुटुंबियांशी किंवा मित्रांशी चर्चा करून पडताळावी, असेही त्यांनी सांगितले. सायबर गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर तक्रार करा. तक्रार जितक्या लवकर केली जाईल, तितकी कारवाईची संधी वाढते, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास कराड शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू तासिलदार, पोनि महेंद्र जगताप, सपोनि खरात, लायन जगदीश पुरोहित, महेश खुस्पे, झोन चेअरमन मंजिरी खुस्पे, शासकीय कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ.इंदिरा घोनमोडे, इला जोगी, जितेंद्र जाधव, शशिकांत पाटील, फारुख पटवेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांची ओळख संदीप तलाठी, अ‍ॅड.सतीश पाटील, अविनाश भिसे यांनी करून दिली. सूत्रसंचालन राजेश शहा यांनी केले. आभार सचिव सुप्रीम तावरे यांनी मानले. कार्यक्रमास लायन्स क्लबचे पदाधिकारी, विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. येथील टाऊन हॉल येथे कार्यक्रम झाला.