कराड प्रतिनिधी | कराड शहरात तशी पहिली तर वृक्षांची संख्या ही जास्त आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी कराड पालिकेकडून वृक्षगणना करण्यात आली. त्यावेळी ३७ हजारांपेक्षा जास्त वृक्षसंख्या होती. मात्र, त्यावेळी तीन मीटरपेक्षा कमी उंचीचे वृक्ष मोजण्यात आले नव्हते. सध्या या वृक्षांची उंची वाढली असून, एकूण वृक्षसंख्या पन्नास हजारांवर पोहोचली असल्याची समाधानकारक बाब पालिकेच्या पाहणीतून समोर आली आहे.
कराड शहरात यापूर्वी एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लबने स्वयंस्फूर्तीने २०१२ मध्ये वृक्षगणना केली होती. त्या गणनेत २१ हजार ४६४ वृक्षांची नोंद झाली होती. त्यावेळी शहराची लोकसंख्या ५३ हजार ९३० इतकीच होती. त्यानंतर नऊ वर्षांनी म्हणजेच २०२१ साली पालिकेने शहरातील वृक्षांची अधिकृतपणे नोंद केली. त्या वृक्षगणनेत शहरात ३७ हजार ५४ वृक्षांची नोंद झाली. या गणनेवेळी तीन मीटरपेक्षा कमी उंचीचे वृक्ष मोजण्यात आले नव्हते.
त्यामुळे सध्या त्या वृक्षांची झालेली वाढ लक्षात घेता शहरातील वृक्षसंख्या ५० हजारांहून अधिक असण्याची शक्यता पालिकेने वर्तवली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे ४० टक्के वृक्ष असलेले कराड हे जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर ठरत आहे.
वॉर्डनिहाय वृक्षसंख्या
वॉर्ड : वृक्ष
एक : ६५५१
दोन : ७६६५
तीन : ५९८
चार : २५८
पाच : १३८
सहा : ११३९
सात : ७५
आठ : १७०
नऊ : ९८२
दहा : १७८७
अकरा : ४०३४
बारा : २९१०
तेरा : २५२९
चौदा : १२१८
मियावाकी प्रकल्पात २६ हजार ९०० झाडे
शहरातील मियावाकी प्रकल्पात आतापर्यंत २६ हजार ९०० झाडे लावण्यात आली आहेत. तसेच, कोविड स्मशानभूमी परिसर ४ हजार ५००, प्रीतिसंगमावर ४ हजार ५००, बाराडबरे परिसरात ६ हजार ५००, नाना-नानी पार्कनजीक १ हजार ५००, विविध संस्थांच्या वतीने १ हजार, तर इदगाह मैदानात दुसऱ्यांदा ७ हजार ५०० झाडे लावण्यात आली आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियान, पालिका व नागरिकांच्या संगोपनामुळे शहरात प्रतिवर्षी किमान दोन हजार वृक्ष वाढत असून, सध्या शहरात १६७ प्रकारचे वृक्ष आहेत.