सांस्कृतिक कार्यमंत्री शेलारांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट; शहिद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकास अभिवादन

0
3

सातारा प्रतिनिधी । राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज प्रथमच साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट दिली. यावेळी संग्रहालयाची व्यवस्था पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची चर्चा करीत त्यांच्याकडून व्यवस्था समजून घेतल्या. मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक वस्तू, गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती, शिवकालीन शस्त्रे पाहिली. त्यानंतर शहिद कर्नल संतोष यशवंत महाडिक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या सातारा येथील स्मृती उद्यानास भेट दिली तसेच यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले (Shivendrasinh Bhonsle) , भाजप जिल्हाह्य्क्ष धैर्यशील कदम, संग्रहालयाचे अधिकारी, भाजप कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या मराठा साम्राज्याच्या शौर्याचं प्रतीक असलेली वाघनखं महाराष्ट्र शासनाने लंडनहून महाराष्ट्रात आणली आहेत. सध्या ती साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, आज सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार सातारा दौऱ्यावर असताना प्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले. सातारा दौऱ्यावर असलेल्या मंत्री शेलार यांनी संघ परिवारातील विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद देखील साधला.