सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत उत्साहाने सहभाग घेतला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक संकटे आदी कारणांनी पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकूण ६३ हजार पीक विमा अर्ज भरण्यात आले आहेत.
यामधील ५० हजारांवर अर्ज माण तालुक्यातून दाखल झाले आहेत, तर २५ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग, दुष्काळ आदींचा सामना करावा लागतो. अशा संकटांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरली आहे.
पूर्वी शेतकऱ्यांना पिकांचा विमा उतरविण्यासाठी ठरावीक रक्कम भरावी लागत होती, पण मागील वर्षाच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा देऊ केला आहे. याचा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सातारा जिल्ह्यातही रब्बी हंगामात एक रुपयात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभाग घेतला. उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य आणि केंद्र शासन भरणार आहे.
यंदाच्या हंगामात रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, रब्बी कांदा, उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी ही योजना लागू आहे. ज्वारीसाठी सहभागाची मुदत ३० नोव्हेंबरला संपल्यानंतर गहू, हरभरा आणि कांद्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत विमा भरता येणार होता. या मुदतीत ६३ हजार ८११ अर्ज विम्यासाठी दाखल झाले. यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना ज्वारीसाठी हेक्टरी २६, तर गव्हासाठी ३० हजारांपर्यंत भरपाई मिळणार आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामातील क्षेत्र दोन लाख हेक्टरवर आहे; पण उन्हाळी भुईमूग सोडून इतर पिकांसाठी मुदतीत शेतकऱ्यांनी २४ हजार ८९२ हेक्टर क्षेत्राचाच विमा उतरविला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी हंगामात विमा संरक्षित क्षेत्रात वाढ झालेली आहे.
कोणत्या तालुक्यात किती कर्ज ?
तालुका – अर्ज
जावळी – १४६
कऱ्हाड – ३४७
खंडाळा – २,३९८
खटाव – ६,४९६
कोरेगाव – ३७१
महाबळेश्वर – ४७
माण – ५०,७८२
पाटण – ३३
फलटण – २,३९८
सातारा – २८०
वाई – ५१३
पीक विमा संरक्षित रक्कम हेक्टरी रुपयांत
ज्वारी बागायत २६,०००
ज्वारी जिरायत २०,०००
गहू ३०,०००
हरभरा १९,०००
कांदा ४६,०००
भुईमूग ४०,०००