कराड शहर । शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंडाला एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारीत झाला होता. तेव्हापासून पसार असलेल्या कुंदन जालिंदर कराडकर (रा. गजानन हौसिंग सोसायटी, कराड) याला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेऊन त्याची रवानगी सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे.
कराड शहरात विविध प्रकारचे 10 गुन्हे करुन त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक़ कारवाई करुनही तो प्रशासन व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत गुन्हे करुन शहरात दहशत माजवित होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्फत जिल्हादंडाधिकाऱ्यांकडे स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता.
प्रस्तावाच्या चौकशीनंतर कुंदन कराडकर यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द करण्याचा आदेश पारित झाला होता. मात्र, तेव्हापासून तो परागंदा होता. त्याला पुण्यातून ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची रवानगी सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे. कराड पोलिसांनी केलेली स्थानबद्धतेची ही कोल्हापूर परिक्षेत्रातील एकमेव कारवाई ठरली आहे. अशा कारवाईच्या माध्यमातून सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील करत आहेत. या कारवाईमुळे कराड शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.