एकाची साडेआठ लाखांची फसवणुक केल्या प्रकरणी नवरा बायकोवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात सध्या फसवणुकीचे गुन्हे घडत आहेत. असाच पती पत्नीने एकाची फसवणुक केल्याचा गुन्हा नुकताच घडला असून भाडेतत्त्वावर वाहने घेऊन वाहन मालकांना भाडे तसेच संबंधित वाहने परत न करता साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कराड तालुक्यातील घारेवाडी येथील पती-पत्नीवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुदर्शन आनंदराव वारुंग (रा. येरवळे) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. प्रभुदास शहाजी आगवणे व छाया प्रभुदास आगवणे (दोघेही रा. येरवळे, सध्या रा. घारेवाडी, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील येरवळे येथील सुदर्शन वारुंग यांचा ट्रॅक्टर व ट्रॉली होती. सुमारे ३ वर्षांपूर्वी प्रभुदास आगवणे आणि छाया आगवणे या दोघांनी त्यांच्या बांधकाम व्यवसायासाठी संबंधित ट्रॅक्टर-ट्रॉली भाडेतत्त्वावर एका बांधकाम साईटसाठी लागणार असल्याचे सांगून सुदर्शन वारुंग यांच्याकडून घेतली. तसेच ट्रॅक्टर-ट्रॉली वारुंग यांना त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे सोडण्यास सांगितले.

त्याचबरोबरच पुणे येथील नौशाद शिकलगार यांच्याकडून जनरेटर भाडेतत्त्वावर घेऊन तोही छत्रपती संभाजीनगर येथे पाठवून दिला. दरमहा अठरा हजार रुपये भाड्याने ट्रॅक्टर-ट्रॉली देण्याचे ठरले होते. सुरुवातीला दोन ते तीन महिने ट्रॅक्टर-ट्रॉलीचे भाडे सुदर्शन वारुंग यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. मात्र, त्यानंतर पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे सुदर्शन वारुंग यांनी प्रभुदास आगवणे व त्यांची पत्नी छाया आगवणे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी साईटवर इतरांचे देणे बाकी असल्यामुळे ट्रॅक्टर-ट्रॉली मिळणार नाही, असे सांगितले.

सुदर्शन वारुंग यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन खात्री केल्यानंतर ट्रॅक्टर एकाकडे तर ट्रॉली दुसºयाकडेच असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर ते पुन्हा गावी आले. प्रभुदास आगवणे यांची भेट घेण्यासाठी ते त्यांच्या घरी गेले असता त्यांच्याप्रमाणेच अरुण खाशाबा जाधव यांचा सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा वाळू उपसायचा मडपंप, डंपिंग ट्रेलर, वीस स्टील पाईप तसेच दत्तात्रय बसाप्पा चाळेकर यांची सुमारे दोन लाख रुपये किमतीची पिकअप जीप आगवणे दापत्याने भाडेतत्त्वावर घेतले.

त्यानंतर वेगवेगळ्या साईटवर पाठवल्याचे वारुंग यांना समजले. ती वाहनेही संबंधित वाहन मालकांना परत मिळाली नाहीत. संबंधित दाम्पत्याने सर्व वाहन मालकांची सुमारे साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुदर्शन वारुंग यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.