सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. सातारा शहरातील किल्ले अजिंक्यताराच्या प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कराड तालुक्यात भुयाचीवाडी येथे कृष्णा नदीवरील बंधाऱ्याला भगदाड पडले. त्यामुळे काही भाग वाहून गेला आहे. त्याचबरोबर पाटण तालुक्यात रस्ता खचल्याच्याही घटना घडली आहे.
सातारा शहरात बुधवारी पहाटेपासून पाऊस कोसळत असून याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. शहराला लागूनच असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच सकाळच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. किल्ल्यावरून दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सातारा पालिकेच्या वतीने जेसीबीच्या साह्याने दरड हटविण्याचे काम केले जात आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
दरम्यान, कराड तालुक्यातील भुयाचीवाडी येथे कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला. याबाबत जलसंपदा विभागाने तत्काळ आवश्यक कार्यवाही सुरू केली असून प्रशासनाने परिसरातील नागरिकांना खबरदारीची सूचना केली आहे. धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आलेले आहे.