चुलत्याच्या खूनप्रकरणी पुतण्याला जन्मठेप; ऊसतोडीच्या पैशातून झाली होती वादावादी

0
552
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कारंडेवाडी- कुकुडवाड (ता. माण) येथे ऊसतोडीच्या पैशावरून चुलत्याचा खून केल्याप्रकरणी पुतण्याला वडूज येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

संदीप वसंत चव्हाण (वय २८, रा. कारंडेवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, की कारंडेवाडी येथे १९ मे २०२० मध्ये संदीप चव्हाण व लक्ष्मण अण्णा चव्हाण (वय ४९) यांच्यात ऊसतोडीच्या पैशातून वादावादी झाली होती. त्या रात्री लक्ष्मण चव्हाण हे घराच्या अंगणात झोपले होते. त्याचा राग मनात धरून संदीप चव्हाण याने गळ्यावर सुरा मारला. यात लक्ष्मण चव्हाण यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले, तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सरकारी वकील अजित कदम (साबळे) यांनी काम पाहिले यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दारसो यांनी संदीप चव्हाणला दोषी ठरून जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात प्रॉसिक्युशन स्क्वाड पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, पोलिस हवालदार विजयालक्ष्मी दडस, सागर सजगणे, आमीर शिकलगार, जयवंत शिंदे आदींनी सहकार्य केले.