सातारा प्रतिनिधी | म्हासुर्णे (ता. खटाव) येथे शेताला पाणी पाजण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात चुलत्याकडून पुतण्याचा खून झाला होता. याप्रकरणी वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पांडुरंग बाळकू यमगर (वय 76) या चुलत्याला दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 8 मे 2014 रोजी म्हासुर्णे येथील यमगर वस्तीवरील भवानी मंदिराजवळ आरोपी पांडुरंग यमगर याने उरमोडी पाटाचे पाणी त्याच्या जमिनीच्या बाजूने वाहत होते. दरम्यान, मयत राजेंद्र सीताराम यमगर (वय 32) याने चर खोदून ते पाणी अडवून आपल्या पिकाकडे वळवले होते. याचा राग मनात धरून पांडुरंग यमगर याने राजेंद्र यमगर यांना आपल्या हातातील खोरे डोक्यात घातले. यामध्ये राजेंद्र यमगर यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांच्या कवटीचे हाड तुटून मेंदूस गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चुलता पांडुरंग यमगर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. जी. दळवी यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून वैद्यकीय पुरावे जमा करून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वडूज यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.
याकामी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील वैभव काटकर यांनी काम पाहिले. त्यांना वडूज येथील अॅड. प्रशांत पाटील यांनी सहकार्य केले. यामध्ये सरकार पक्षातर्फे 8 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीला 10 वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. याकामी उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोनि घनश्याम सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रॉसिक्युशन स्क्वाड पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, पोलिस हवालदार विजयालक्ष्मी दडस, सागर सजगणे, जयवंत शिंदे, अमीर शिकलगार यांचे सहकार्य लाभले.