सातारा प्रतिनिधी | आरोपीस जामीन मिळवून देण्यासाठी चक्क न्यायाधीशांनीच लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यातून समोर आला होता. विशेष म्हणजे एसीबीने रंगेहात पकडल्याने हा भांडाफोड झाला. साताऱ्यातील सत्र न्यायालय परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये न्यायाधीशासह आणखी तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना काल ताब्यात घेतले होते. साताऱ्यातील लाच प्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायाधिशांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला.
तब्बल 5 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी जाळ्यात अडकलेले धनंजय निकम यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार देत त्यांचा अर्ज फेटाळून लावला. सातारा लाच लुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचून न्यायाधीश निकम यांच्यासह चौघांना रंगेहात पकडले होते. त्यानंतर, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. एका खटल्यातील संशयीत आरोपीला जामीन देण्यासाठी न्यायाधिशांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याबद्दल तक्रारदाराच्या माहितीवरुन लाच लुचपत विभागाने छापा मारत ही कारवाई केली होती.
सर्वसामान्यांच्या न्याय-हक्काचे ठिकाण म्हणून न्यायालयाकडे पाहिले जाते. पोलिसांकडून अन्याय झाल्यानंतरही न्यायालयात आपण पाहू, न्यायालयात आपणास न्याय मिळेल, अशी भावना सर्वसामान्यांची असते. मात्र, न्यायाधीश महोदयच लाच घेताना रंगेहात पकडल्यामुळे न्यायपालिकेवरही शंका उपस्थित झाली. तसेच, न्यायालयाच्या कामकाजाला धक्का पोहोचवण्याचं काम न्या. निकम यांच्या कृत्याने केलं. मात्र, त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे.