सातारा प्रतिनिधी । वाई शहराच्या मध्यवस्तीत असणारी वाई सातारा व वाई पुणे या राज्यमार्गालगत खासगी जागेत वसलेली झोपडपट्टी अतिक्रमानचे मुख ठिकाण बनली होती. दरम्यान, मोकळ्या जागेत अतिक्रमण करत पक्की घरे बांधून मोठे अतिक्रमण करण्यात आले होते. यावर धडक कारवाईची करण्यात यावी, अशी मागणी अनेक दिवसापासून नागरिकांकडून केली जात होती. दरम्यान, यशवंतनगर हद्दीतील भीमनगर झोपडपट्टी न्यायालयाच्या आदेशानुसार मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. यामुळे हा सर्व पूर्ण परिसर मोकळा झाला.
न्यायालयाने झोपडपट्टी हटवण्याबाबत ५ वर्षांपूर्वी निर्णय दिला होता. राजकीय दबावातून कारवाईस उशीर होत होता. १९८५ सालच्या दरम्यान बावधन नाका परिसरात असणारी ही झोपडपट्टी लागलेल्या आगीत जळाली होती. यावेळी या जागेचे तत्कालीन मालक पोपटलाल व माणिकशेठ ओसवाल यांनी संबंधितांना मदत करत आधार दिला होता. यावेळी परिसरात सात ते आठ झोपड्या होत्या. संबंधितांनी विनंती केल्यामुळे ते या जागेत राहत होते. मात्र नंतर दहशत आणि राजकीय दबावामुळे या लोकांनी या जागेत हातपाय पसरत संपूर्ण जागेत घरे बांधली होती. यामुळे रस्त्याला अडथळा येत होता. तसेच या जागेत काही पोलिसी दप्तरावरील लोकही राहत होते.
जागा मालकांनी न्यायालयात दावा दाखल करून पाच वर्षांपूर्वी त्याचाही निकाल लागला होता. तरीही राजकीय वरदहस्त असल्याने पाच वर्षांपासून जागा मालकांना जागा खाली करून मिळत नव्हती. शेवटी जागा मालक दीपक ओसवाल यांनी संबंधितांना सोमजाई नगर परिसरात प्रत्येकी अर्धा गुंठा जागा उपलब्ध करून दिली. नंतर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनीही योग्य ती मध्यस्थी केली. त्यानंतर येथील सर्व लोकांनी त्याजागी स्थलांतरित होत ही जागा स्वतःहून खाली केली. जागेवरील सर्व साहित्य व्यवस्थितरीत्या बाहेर काढण्यात आल्यानंतर सर्वांची घरे पाडण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.