सातारा लोकसभेसाठी ‘अशी’ केली जाणार मतमोजणी; 584 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक २०२४ साठीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता ४ जून रोजी प्रत्यक्ष मतमोजणीनंतर येणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघाची मतमोजणी सातारा कोडोली येथील जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या गोदामात होणार असून प्रत्येक विधानसभानिहाय २० टेबलांवर ही मोजणीसाठी ५८४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र २० टेबलांवर ही मोजणी केली जाणार असून त्यासाठीची सर्व तयारी निवडणूक विभागाने पूर्ण केली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे अशी चुरशीची व प्रतिष्ठेची लढत आहे. या मतदारसंघात एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. साताऱ्याच्य निकालाकडे संपूर्ण राज्याचे नव्हे, तर देशाचे लक्ष लागले आहे. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध खासदार शरद पवार अशीच लढत मानली जात आहे. त्यामुळे मतमोजणी कशी होणार? निकाल कधी बाहेर येणार? याबाबत सर्वांची उत्सुकता आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण ६३.१६ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ६७.५९ टक्के, तर सर्वात कमी मतदान पाटण विधानसभा मतदारसंघात ५६.९५ टक्के झाले आहे. ६४.९८ टक्के पुरुष, तर ६१.२८ टक्के स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दि. ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीची जिल्हा निवडणूक विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. कोडोलीतील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या गोदामात मतमोजणी होईल. सातारा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्र मतमोजणी होईल. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २० टेबल असतील.

त्यासाठी ११६८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये १४६ मायक्रो ऑब्झवर, मतमोजणी निरीक्षक १४४, मतमोजणी सहायक १५०, तसेच १४४ शिपाई अशी एकूण ५८४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच टपाली मतदानाची मोजणी करण्यासाठी १४ टेबल असतील. त्यासाठी ९० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मायक्रो ऑब्झवर १८, मोजणी निरीक्षक १८, मोजणी सहायक ३६, शिपाई १८, असे कर्मचारी असतील. सकाळी आठ वाजता मोजणीस सुरुवात होईल, सुरुवातीला पोस्टलची मोजणी व त्यानंतर विधानसभानिहाय मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे.