सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य पिंजून काढत सरकारला आरक्षण प्रश्नि निर्णय घेण्यास भाग पाडले. जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विविध स्तरावर प्रामाणिक प्रयत्न केले. विधानसभेत, विधानभवनात प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्याबद्दल मराठा संघर्ष समितीच्या समन्वयकांनी नुकतीच आमदार शिंदे यांची भेट घेतली. तसेच सन्मान करत पेढा भरविला.
मराठा संघर्ष समितीने केलेल्या सन्मानानंतर आमदार शिंदे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये आ. शिंदे यांनी म्हंटले आहे की, गोरगरीब मराठा समाजाच्या मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील आणि आंदोलक नवी मुंबई येथे आले असता सर्व व्यवस्था करण्याची संधी मिळाली. याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. मराठा समाजातील तरुणांचा उत्कर्ष व्हावा, यासाठी माझा प्रयत्न राहील!
आमदार शिंदे यांच्या सन्मानावेळी मराठा संघर्ष समितीचे श्री. विनोद पोखरकर, श्री. विजय देशमुख, श्री. माऊली बर्वे, डॉ.अमरदिप गरड, डॉ.बाळासाहेब जगताप आदी मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.