कराड प्रतिनिधी । राज्यात कंत्राटी भरतीच्या जीआरवरून चांगलच राजकारण तापले आहे. अशात आता कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात सध्या कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांवर एन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ आली आहे. कारण येथील कार्यरत असलेल्या सांगली सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक अजित पाटील यांच्यासह सात सुरक्षा रक्षकांना गेल्या सहा महिन्यापासून पगारच मिळालेला नाही. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे युवानेते मनोज माळी यांनी कराड येथे उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनाबाबत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली.
कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाच्या सुरक्षेबाबत सुरक्षा रक्षकांकडून काळजी घेतली जातेय. मात्र, उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी अधीक्षकांच्या गलथान कारभारामुळे सुरक्षा रक्षकांना वेतन मिळत नाही. याबाबत शासनस्थरावर पाठपुरावा करण्याची मागणी माळी यांनी केली. कराड येथील उपजिल्हा रुग्णालयास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भेट देण्यासाठी आले होते. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे युवानेते मनोज माळी यांनी त्यांची भेट घेतली.
मनोज माळी यांच्याकडून अनेक वर्षांपासून कराड येथील उपजिल्हा रुग्णालयातील समस्या, रुग्णांना आरोग्याच्या दृष्टीने निर्माण होत असलेले प्रश्न, समस्या या सोडवल्या जात आहेत. उपोषण, आंदोलनाच्या माध्यमातून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश करण्याचे काम मनोज माळी यांनी केले आहे. दरम्यान, सोमवारी माळी यांनी थेट पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेत रुग्णालयातील समस्या, अडचणी, सुरक्षा रक्षक यांना सहा महिन्यापासून मिळत नसलेले मासिक वेतन याबाबत चर्चा केली.
…तर तीव्र स्वरूपात आंदोलन करू : मनोज माळी
कराड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील समस्या, दुर्गंधी, सुरक्षा रक्षकांचा वेतनाचा प्रश्न याकडे प्रभारी अधीक्षक डॉ. राजेश शेडगे यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत शासनाकडून योग्य कारवाई केली न गेल्यास प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली कराड येथे तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे युवानेते मनोज माळी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिला.
वेतनच नसल्याने दिवाळी कशी साजरी करायची? : सुरक्षा रक्षक अजित पाटील
सांगली सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात सुरक्षा रक्षकांची कंत्राटी स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे. कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील आमच्या सात सुरक्षा रक्षकांचा पगार गेल्या सहा महिन्यापासून झालेला नाही. जिल्ह्यात इतर ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांचे पगार मात्र महिन्याच्या महिन्याला वेळच्या वेळी होतात. मात्र, आमचेच का होत नाहीत. येथील प्रभारी अधीक्षकांकडे विचारणा केल्यास ते आम्ही प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगतात. म्हणून आम्ही आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आहे. त्यांच्यापुढे आमचा प्रश्न मांडला आहे. त्यांनी आमच्या वेतनाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती सुरक्षक रक्षक अजित पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.