सातारा प्रतिनिधी | गेल्या महिनाभरापासून गतीने सुरू असलेलं साताऱ्यातील मेडिकल कॉलेजचं बांधकाम मंगळवारी बंद पाडण्यात आलं. तसेच ठेकेदारासह कर्मचाऱ्यांनी पलायन केलं असून कोणाची तक्रार नसल्याने प्रशानाही मूग गिळून गप्प आहे. या घटनेची सध्या साताऱ्यात उलटसुलट चर्चा आहे.
काम बंद ठेवायला कार्यकर्त्यांनी भाग पाडले?
साताऱ्यातील कृष्णानगरमध्ये मेडिकल कॉलेजचे बांधकाम सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून कॉलेजचं बांधकाम गतीनं सुरु असताना मंगळवारी सकाळी अचानक काम बंद झालं. साताऱ्यातील नेत्याच्या कृष्णानगरमधील स्थानिक समर्थकांनी काम बंद ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना धमकावले असल्याची चर्चा आहे. यामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे.
ठेकेदारासह मजुरांचं पलायन
काम बंद ठेवून ठेकेदारासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पलायन केलं आहे. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणीही तक्रार केली नव्हती. कॉलेजचे डीन श्री. गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली असून काम बंद असल्याचा रिपोर्ट ठेकेदाराने अद्याप दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मोबाईल बंद ठेवून ठेकेदारही गायब झाला आहे. यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेतंय, याकडे सातारकरांचं लक्ष लागलं आहे.