कराड प्रतिनिधी | पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज गावच्या हद्दीत कराडहून सातारच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा टायर फुटल्याने तो उंब्रज पुलावर उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकला. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही भीषण अपघाताची घटना घडली असून उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कराड होऊन सातारच्या दिशेने कंटेनर क्रमांक (एम एच 12 TV 9653) हा निघालेला होता. रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास कंटेनर करार होऊन सातारच्या दिशेने निघाला असता तो उंब्रज येथे उड्डाण पुलावर आला. यावेळी उंब्रज येथील उड्डाणपुलावर दुसरा ट्रक (क्रमांक 01 AA 2776) उभा होता. यावेळी उभ्या असलेल्या ट्रकला टायर फुटल्याने कंटेनर जोरात जाऊन धडकला. धडक इतकी भीषण होती की कंटेनरची पुढील बाजू पूर्णपणे ट्रकच्या मध्यभागी जाऊन घुसली.
यामध्ये कंटेनरच्या पुढील बाजूचा पूर्णपणे चक्काचूर झाला. रात्रीचा अंधार असल्याने शिवाय कंटेनर आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याने परिसरातून जाणारी वाहतूक काहीकाळासाठी विस्कळीत झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, या अपघाताची माहिती उंब्रज पोलीस ठाणेतील कर्मचारी तसेच महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कंटेनर मधील जखमी झालेल्या चालकास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तसेच अपघात झालेला कंटेनर व ट्रक बाजूला केला व नंतर वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या अपघातातील जखमींवर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झालेली नव्हती.