सातारा प्रतिनिधी | नादुरुस्त कंटेनर व टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची घटना पुणे – बंगळूर महामार्गावरील शिरवळ ता. खंडाळा येथे बुधवारी घडली. या अपघातामध्ये टेम्पो चालक जागीच ठार झाला.
किरण वसंत मोरे (वय ३५, रा. मोरेमळा, ता. पलूस, जि. सांगली) असे अपघातात ठार झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगलोर महामार्गावरील शिरवळ येथील श्रीराम हॉटेलनजीक बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पुण्याहून सातारच्या दिशेने निघालेला टेम्पोची (क्र. एम. एच. १० डी. टी. ८३८४) रस्त्यावर नादुरुस्त स्थितीमध्ये उभ्या असलेल्या कंटेनरला (क्र.एम. एच.१२. एच. डी ४११९) जोराची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, टेम्पोच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये टेम्पो चालक किरण मोरे जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती कळताच शिरवळ पोलिस व शिरवळ रेस्क्यू टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबवले. सोमनाथ टिके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या अपघाताची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शंकर पांगारे करत आहेत.