पुणे-बंगळूर महामार्गावर खोडद गावच्या हद्दीत कंटेनर पलटी; कंटेनर चालक किरकोळ जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निसराळ फाटा खोडद गावाच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर मुख्य महामार्गावर पलटी होऊन अपघात झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कंटेनरमधील चालक किरकोळ जखमी झाला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून कंटेनर (क्रमांक MH04 HS 1384) हा साताऱ्याहून कोल्हापूरकडे निघाला होता. यावेळी कंटेनर निसराळ फाटा खोडद गावाच्या हद्दीत आला असताना अचानक कंटेनरमधील चालक सचिन कट्टे (वय 30, रा. गोंदवले ता. माण) याचा ताबा सुटला. यानंतर कंटेनर महामार्गावरील मुख्य रस्त्यावरच पलटी झाला.

कंटेनर महामार्गावर अचानक पलटी झाल्याने कराडकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली. या घटनेची माहिती महामार्ग देखभाल विभागाचे इन्चार्ज दस्तगीर आगा, तुषार जोशी, सुरज लोखंडे. प्रवीण चव्हाण यांना परिसरातील नागरिकांनी दिली. माहिती मिळाल्यानंतर संबंधित कर्मचारी क्रेनसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. कंटेनरमधील जखमी झालेल्या चालकास बाहेर काढून त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दवाखान्यात पाठविले. तसेच क्रेनच्या साह्याने कंटेनर महामार्गावरील मुख्य रस्त्यावरून बाजूला घेतला यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.