कराड प्रतिनिधी | सहापदरीकरणासाठी पुणे बंगळूर महामार्गावर मलकापूरात केलेल्या बॅरिकेटींगमुळे वाहतूक कोंडी होत असते. मात्र, सातारा कोल्हापूर लेनवर कंटेनर पलटी झाल्याने चार किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जॅम झाले होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर येथील गंधर्व हॉटेलजवळ बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी पहाटे पूर्वेकडील उपमार्गावरील सातारा-कोल्हापूर लेनवर कंटेनर पलटी झाल्याने ट्रॅफिक जॅम झाले होते. रस्ता अरूंद आणि वाहनांची वरदळ व त्यातच कंटेनर पलटी झाल्याने मलकापूरात वाहातूक कोंडी होऊन या लेनवर चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तर आज महाराष्ट्र दिनासाठी बाहेर पडलेल्यांना वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला. कोल्हापूरनाका ते मलकापूरफाटा परिसरात वाहतूक वळवलेल्या ठिकाणची वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागत होती.
शेवटी सकाळी ११ वाजता डीपी जैनच्या तीन क्रेन लावून कंटेनर बाजूला करून रस्ता सुरळीत केला. यावेळी डीपी जैन चे प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र सिंग वर्मा, नागेश्वर राव, संजय पटेल, पोलीस कर्मचारी अश्विनी सूर्यवंशी, सोनम पाटील, डीपी जैन चे कर्मचारी दस्तगीर आगा, संभाजी घुटुगडे, जगनाथ थोरात, सुनील थोरात, अभिषेक व सोनू गुप्ता यांच्यासह हायवे पेट्रोलिंग टीम तसेच आप्पासाहेब खबाले, आदिनाथ भोसले त्या ठिकाणी येऊन गाडी काढण्यास मदत केली.