सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काशिळ गावाच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर मुख्य महामार्गावर पलटी होऊन अपघात झाल्याची घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कंटेनरमधील चालक किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या पाच वाजण्याच्या सुमारास पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून कंटेनर (क्रमांक KA 65 1150) हा पुण्याहून कर्नाटककडे निघाला होता. यावेळी कंटेनर काशीळ गावच्या हद्दीत आला असताना अचानक कंटेनरमधील चालक मोहम्मद याचा स्टेअरींगवरील ताबा सुटला. यानंतर कंटेनर २ ते ३ एनजीपीला धडकून मुख्य महामार्गावर जाऊन पलटी झाला. तसेच कंटेनरमधील चालक देखील किरकोळ जखमी जखमी झाला.
पहाटेच्यावेळी अचानक कंटेनर महामार्गावर पलटी झाल्याने कराडकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. या घटनेची माहिती महामार्ग देखभाल विभागाचे इन्चार्ज दस्तगीर आगा, तुषार जोशी, बाजीराव चव्हाण, सुरज लोखंडे, सचिन जाधव, जनता क्रेनचे मालक अब्दुल भाई यांना परिसरातील नागरिकांनी दिली. माहिती मिळाल्यानंतर संबंधित कर्मचारी क्रेनसह घटनास्थळी दाखल झाले. कंटेनरमधील जखमी झालेल्या चालकास बाहेर काढून त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दवाखान्यात पाठविले. तसेच क्रेनच्या साह्याने कंटेनर महामार्गावरील मुख्य रस्त्यावरून बाजूला घेतला. यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.