कराड प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्यावतीने शुक्रवारी (ता. २०) शिंदेवाडी – विंग येथे दुपारी ३ वाजता भव्य बांधकाम कामगार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पात्र लाभार्थींना साहित्य वितरण केले जाणार आहे. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून व महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोदंणीकृती बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य संच पेटीचे वितरण केले जाते. तसेच पात्र लाभार्थींना भांडी, तसेच बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना शिष्यवृत्तीचे वितरण केले जाते. कराड दक्षिणमध्ये बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. भाजपा कामगार आघाडीच्या माध्यमातून अनेक पात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी विशेष अभियानही राबविले जात आहे.
या लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून साहित्याचे वितरण राज्याचे कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते या बांधकाम कामगार संमेलनात केले जाणार आहे. तसेच यावेळी बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना शिष्यवृत्तीचे वितरणही केले जाणार आहे. या कार्यक्रमाला कराड दक्षिणमधील बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष रुपेश देसाई यांनी केले आहे.