सातारा प्रतिनिधी | गेल्या अनेक वर्षांपासून महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी केली जात मागणी होती. शिवाय याठिकाणी संशोधन केंद्रासाठी राहुरी कृषी विद्यापीठाने हिरवा कंदिल देखील दाखविला होता. मात्र, काही कारणांनी याठिकाणी संशोधन इमारत बांधणीचे काम रखडले होते. मात्र, आता येथील संशोधन इमारतीच्या बांधकामास आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी मंजूर केला आहार. नाकिंदा, ता. महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राचे काम सध्या सुरू झाले असून, यासाठी पहिल्या टप्प्यात 40 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या स्ट्रॉबेरीवरील संशोधनासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना साकार होत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कृषी विकास योजना 2022-23 अंतर्गत या केंद्राला मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्रांतर्गत राबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी 343.63 लाख रुपयांचा निधी पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संचालकांनी (संशोधन) शासनास सादर केलेल्या प्रस्तावानुसार या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. केंद्राच्या इमारतीचा बांधकम खर्च दोन कोटी 31 लाख, स्ट्रॉबेरी लागवड आणि संशोधनासाठी 79 लाख आणि कृषी अवजारांसाठी 40 लाख रुपये खर्च येणार आहे.
स्ट्रॉबेरीवर असे होणार संशोधन
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरचे वातावरण स्ट्रॉबेरीला पोषक असले तरी बुरशीनाशक, कीटकशानक तसेच जमिनीतून तयार होणाऱ्या रोगराईचा या पिकाला दरवर्षी फटका बसतो. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादनातही घट होते. अशा सर्व
प्रकारच्या रोगांचे तसेच येथील माती, पाणी आणि रोपांचे प्रयोगशाळेत संशोधन होणार असून, शेतकऱ्यांना रोगास प्रतिकारक्षम असलेल्या रोपांची लागवड करता येणार आहे.
उद्धव ठाकरेंनीही मुख्यमंत्री असताना दिल्या होत्या सूचना
महाबळेश्वरमधील विद्यापीठाच्या गहू गेरवा संशोधन केंद्रातच हे स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
अशाप्रकारे असेल केंद्र…
महाबळेश्वरात सध्या स्ट्रॉबेरी संशोधन केंद्रच्या इमारतीचे काम सुरु आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सुविधांची उपलब्धता, नवीन जातींची निर्मिती आणि रोपे ठेवण्यासाठीची वातानुकूलित सुविधा असा उभारण्यात येत आहेत.
असा होईल फायदा…
महाबळेशवरात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राची इमारत झाल्यानंतर या याठिकाणी अनेक गोष्टी सहजपणे करता येणे शक्य होणार आहे. या याठिकाणी संशोधन केंद्रात परदेशातून रोपे आयात करून लागवड करण्याची शेतकऱ्यांची कसरत थांबणार आहे. नवीन जातींचा शोध लावण्यास मदत होणार आहे. तसेच निर्यातक्षम स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणे देखील सोपे होणार आहे.
मंत्रिपदाच्या काळातसदाभाऊंनी केला संशोधन केंद्राचा निर्णय जाहीर
सातारा जिल्ह्यातल्या रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे कृषी व पणन राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री असताना त्यांच्याकडे स्ट्रॉबेरीचा फळबाग लागवड योजनेत समावेश करावा, स्ट्रॉबेरीच्या मातृरोपांच्या नर्सरीला अनुदान मिळावे, कोरेगाव येथील घेवड्याला अनुदान मिळावे, ग्रीन हाउसमधील लागवड साहित्यास अनुदान मिळावे आदी मागण्या केल्या होत्या. या मागण्यांची दखल घेऊन सहपालकमंत्री खोत यांनी महाबळेश्वर येथील बैठकीदरम्यान, महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या केंद्रासाठी अडीच हजार एकरांवर स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात येणार होते.