कराड प्रतिनिधी । खासदार उदयनराजे भोसले आणि आमच्यात आता संघर्ष राहिलेला नाही. सातारा जिल्ह्यात आज चार मंत्री महायुतीच्या काळात दिसत आहेत. शरद पवार राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात स्व. अभयसिहराजे यांच्यावर अन्याय झाला त्यांना मंत्रिपदापासून वंचीत ठेवले गेले अन्यथा जिल्ह्याच्या विकासात अधिक भर पडलेली दिसली असती, अशी टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले (Shivendrasinh Bhonsle) यांनी खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर केली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले व राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज खात्याचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आज कराड येथील महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगम येथील समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कराड दक्षिणचे आ. अतुल भोसले, कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, खासदार उदयनराजे यांच्यासह डॉ. अतुलबाबा, जयकुमार गोरे, मनोज घोरपडे, या सर्वांनी एकमेकाला मदत करण्याचे धोरण स्वीकारले. त्यांच्या या धोरणामुळेच सातारा जिल्ह्यात आज 4 मंत्री महायुतीच्या काळात दिसत आहेत. माझा आणि उदयनराजे यांचा संघर्ष हा केवळ स्थानिक राजकारणात कधीतरी दिसला असेल एखाद्या कार्यकर्त्याच्या वार्डातील उमेदवारीवरून तो दिसला असेल. मात्र ते आमचे खासदार आणि मार्गदर्शक आहेत. आम्ही त्यांना खासदार करण्याकरिता आम्ही प्रयत्न केलेत त्यांनीही माझ्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आमच्यात संघर्ष आहे असे म्हणता येणार नाही.
रामराजे कोणत्या पक्षात आहेत हे त्यांनातरी माहीत आहे का?
राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज खात्याचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी आज कराड येथील महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगम येथील समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. रामराजे नाईक निंबाळकर हे नेमके कोणत्या पक्षात आहेत हे त्यांना स्वतःला देखील माहीत नसेल. मलातरी माहीत नाही, अशी टीका मंत्री जयकुमार गोरे यांनी केली.