सातारा प्रतिनिधी | विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबईतील पार्लमेंटरी बोर्ड बैठकीत जिल्ह्यातील माण, वाई आणि कराड दक्षिण मतदारसंघावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. आता आघाडीतील जागा वाटपावर काँग्रेस कोणते मतदारसंघ लढविणार हे स्पष्ट होणार आहे.
सोमवारी आणि मंगळवारी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक मुंबईत झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच सातारा जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, रणजितसिंह देशमुख उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक न जाहीर झाली आहे. तरीही महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागा * वाटप अजून झालेले नाही. दोन्हीही आघाडीतील घटकपक्षात मतदारसंघ ताब्यात घेण्यावरून रस्सीखेच सुरू आहे. काहींनी तर मतदारसंघावर दावे केले आहेत. पण, जागा वाटपानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. सातारा जिल्ह्यातही आघाडीतून काँग्रेसने तीन मतदारसंघावर दावा कायम ठेवलेला आहे. यामध्ये कराड दक्षिण मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहणार आहे. पण, माण आणि वाई मतदारसंघासाठीही काँग्रेस आग्रही आाहे. यासाठी पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांकडेही मागणी करण्यात आलेली आहे.
मुंबईतील बैठकीत सातारा जिल्ह्यातील माण, वाई आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची मागणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यात पक्ष वाढवायचा असेल तर या मतदारसंघाची निवडणूक लढवावी लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर बैठकीत या तीन मतदारसंघांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. तरीही आघाडीच्या जागा वाटपात या तीनपैकी कराड दक्षिण मतदारसंघ मिळणार आहे. पण, इतर दोनमधील माण मतदारसंघतरी मिळावा, अशीच जोरदार मागणी राहणार आहे. यावेळी या मतदारसंघातील स्थितीबाबत चर्चा करण्यात आली.