“पैसा जनतेचा, मोदी-गडकरींच्या खिशातील नाही”; पृथ्वीराज बाबांचा हल्लाबोल; काँग्रेसचे कराडच्या तासवडे टोलनाक्यावर आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील तासवडे टोलनाक्यावर आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व वाहने टोल न घेता सोडून दिली. प्रशासनाने टोलबाबत ठोस भूमिका घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. यावेळी त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. “खड्डेयुक्त महामार्ग असताना दोन-दोन ठेकेदारांना ठेका दिलेला आहे. जनतेचा पैसा आहे मोदी गडकरींच्या खिशातील पैसा आहे का?, असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केला.

कराड तालुक्यातील तासवडे येथील टोलनाक्यावर करण्यात आलेल्या आंदोलनावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह माजी मंत्री आ. विश्वजित कदम व सांगली सातारा जिल्ह्यातील काँगेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोल्हापूर येथील महामार्ग प्राधिकरणाबरोबर आ. सतेज पाटील यांची चर्चा सुरू आहे. सर्व रस्ता सुरळीत झाल्याशिवाय टोल वसुली करू नये, ही प्रमुख मागणी आहे.

अदानी आणि रिलायन्सला महामार्गाच्या कामाचा काय अनुभव आहे म्हणून ठेका दिला? गेल्या वर्षांपासून प्रवाशांची परवड सुरू असून महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पंधरा वीस टक्के कमिशन घेण्यासाठी चुकीच्या मार्गाने काँट्रॅक्ट देण्याची प्रथा मोदींनी सुरू केली आहे. महामार्गाचे सब कॉन्ट्रॅक्ट डीपी जैन यांना दिले असून गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे हजार कामगारांचे पगार झालेले नाहीत. यामुळेच कामाला गती मिळत नसून याचा नाहक त्रास जनतेला भोगावा लागत आहे, असे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.