सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या निरीक्षकांनी सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यावेळी महाविकास आघाडीतून कराड दक्षिण, माण आणि वाई मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी मागणी पुन्हा करण्यात आली आहे. या बैठकीला सातारा जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अनेक बैठका आतापर्यंत पार पडल्या आहेत. त्यामध्येही माण, कराड दक्षिण आणि वाई मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी इच्छुकांच्याही मुलाखती पार पडल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी पुण्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक टी. एस. सिंघदेव आणि एम. बी. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
पुण्यातील बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या ९ मतदारसंघातील विधानसभा जागांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघांचा आढावा झाला. पक्षाची ताकद, विधानसभा निवडणूक लढविण्यात येणाऱ्या मतदारसंघातील स्थिती याची माहिती देण्यात आली. यावेळी सातारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघ काँग्रेसला मिळावेत, अशी मागणी पुन्हा करण्यात आली आहे.